पुणे - सीओईपी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारलेले जम्बो कोविड सेंटर सुसज्ज आणि सर्व सोयींनी युक्त असल्याचे सांगितले गेले होते. 800 बेडच्या या कोविड सेंटरमध्ये 600 ऑक्सिजन आणि 200 व्हेंटिलेटर असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर कोविड सेंटरचा फोल कारभार समोर आला आहे. रायकर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासन जागे झाले असून आता चक्क महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या वाहनातून व्हेंटिलेटर या सेंटरवर आणण्यात आले.
पत्रकार रायकर यांच्यावर जम्बो रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची परिस्थिती खालावत गेली. त्यामुळे त्यांना दुसऱया एका खासगी रुग्णालयामध्ये भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले. जम्बो रुग्णालयातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी कार्डियॅक रुग्णवाहिकीची गरज होती. जम्बो रुग्णालयाकडे असणाऱ्या रुग्णवाहिकेतील व्हेंटिलेटर खराब झाला असल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारात रायकर यांचा जीव गेला.
रायकर यांना तातडीने व्हेंटिलेटर आवश्यक होते. ते या कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार केलेल्या सेंटरवर उपलब्ध नव्हते. या कोविड सेंटरबाबत इतर ही नागरिक तक्रारी करत आहेत. रायकर यांच्या मृत्यूनंतर चोहो बाजूंनी टीका सुरू झाल्यानंतर चक्क महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाडीतून आता आठ व्हेंटिलेटर या सेंटरवर आणण्यात आले. या प्रकाराने कोविड सेंटरचे आणखी वाभाडे निघाले आहेत.