पुणे - केंद्र सरकारने १८ वर्षांवरील लसीकरण जाहीर केल्यानंतर बुधवारी २३ जूनपासून पुणे शहरात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. शहरात १९३ ठिकाणी हे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार आहे. यातील १२५ ठिकाणी कोविशिल्ड लसीचे डोस ४५च्या वरील नागरिकांसाठी तर ५३ ठिकाणी १८ ते ४४ वयोगटासाठी आणि १५ ठिकाणी कोव्हॅक्सिन लसीचे १८ ते पुढील वयोगटासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रति १०० डोस -
या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत. लसीकरणाकरिता सकाळी ८ वाजता ऑनलाइन स्लॉट खुले करण्यात आले आहेत. आजपासून २५ मेपूर्वी डोस घेतलेल्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध तर ज्या नागरिकांनी २५ मेपूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना आज १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. यातील ५० टक्के लस ही ऑनलाइन नोंदणी केलेल्यांना व ५० टक्के लस ही ऑन द स्पॉट नोंदणी केलेल्यांना दिली जाणार आहे.
हेही वाचा - 'डेल्टा प्लस' व्हॅरिएंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची शक्यता; तीन राज्यांना अलर्ट
लसीकरण नियोजन -
कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही. तसेच फ्रंटलाइन कर्मचारी आणि थेट केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस राखीव आहेत. ३० टक्के लस ऑनलाइन नोंदणी करून आलेल्यांच्या पहिल्या डोससाठी तर ३० टक्के लस फ्रंटलाइन आणि थेट कर्मचारी व थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी राखीव आहे. दरम्यान, पुणे शहरात नवीन कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचे गेल्या काही दिवसात असलेला ट्रेंड कायम आहे.
ॲक्टिव्ह रुग्ण संख्या २३५४ -
मंगळवारी २२ जूनला दिवसभरात २२० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली होती. तर दिवसभरात ३३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी पुण्यात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर यात पुण्याबाहेरील १० रुग्ण होते. सध्या शहरात ३४२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४ लाख ७६ हजार २१० इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या २३५४ इतकी आहे. आज ४८७८ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली होती.
हेही वाचा - कोव्हॅक्सिनची लस ७७.८ टक्के लस कार्यक्षम; तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष