पुणे - मोटारीला कट मारण्याच्या कारणावरुन एकास जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये झाला असून घटना सीसीटीव्हीत झाली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार चालक विलास शिंदे आणि मालक शहाजान खान हे मोटारीने दापोडीमार्गे औंधच्या दिशेने जात होते. त्यावेळी एका वळणावर पाठीमागून पुढे येत मोटारीला दुचाकीने ठोकर दिली. दुचाकीवरील दोघे जण खाली पडले, मोटारीतील दोघांना त्यांनी खाली उतरण्यास सांगितले, त्यावेळी चिडलेल्या एकाने मोटारीला दुचाकी आडवी लावली तर, एकाने मोटारीच्या काचेवर बुक्की मारत काच फोडली. हा प्रकार भररस्त्यात सुरू होता. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
चालकाला मोटार रस्त्याच्या बाजूला घ्यायला लावून त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. चिडलेल्या एकाने हातात दगड घेऊन मोटारीवर मारला. यात मोटारीचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी चालक विलास शिंदे यांनी भोसरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोघांचा शोध भोसरी पोलीस शोध घेत आहेत.