पुणे - वर्षा, तुला वाढदिवसाच्या खूप खपू शुभेच्छा...सॉरी, कोरोनाची महामारी सुरू आहे आणि या काळात मी तुझ्या वाढदिवसाला हजर राहू शकत नाही. आता सुद्धा मी दांडेकर पुलावर उभा आहे आणि इथूनच मी तुला शुभेच्छा देतो, त्याचा स्वीकार कर. सामाजिक बांधिलकीचा बंदोबस्त करून मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे तू मला समजून घेशील, असे म्हणत त्यांचे डोळे पाणावतात. हे एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पत्नीसोबत केलेले संभाषण आहे.
पुणे पोलिसात कार्यरत असणारे पोलीस अधिकारी घेवारे यांची पत्नी पोलीस उपअधीक्षक (सीआयडी) वर्षा घेवारे यांचा आज वाढदिवस आहे. पोलीस अधिकारी घेवारे हे कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये पुण्यातील रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे त्यांना पत्नीच्या वाढदिवसासाठी घरी देखील जाता येत नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि तिला शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओ कॉलवर झालेले त्यांचे संभाषण ऐकून भावूक झाल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडिओ कॉलमध्येच त्यांची पत्नी वर्षा म्हणतात, माझ्या वाढदिवसापेक्षा आता तू स्वतःची काळजी घे. तुझ्याबरोबर तुझ्या सहकाऱ्यांची देखील काळजी घे. मला खूप चिंता वाटते.