पंढरपूर (सोलापूर)- मुसळधार पावसानंतर सोलापूर-उजनी धरणातून सोडला जाणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. उजनीतून 2 लाख 25 हजार क्यूसेस तर वीर धरणातून 25 हजार क्यूसेस पाणी सोडले आहे. या विसर्गामुळे भीमेला महापूर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भीमेकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.
उजनी जलाशयातील पाणी पाणी रस्त्यावर आल्याने भिगवणजवळ जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे सोलापूर महामार्गावरील जड वाहतूक बंद केली असल्याची माहिती दिली आहे. उजनी जलाशयातील विसर्गामुळे पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रात 2 लाख 75 हजार क्यूसेसने पाणी पातळीत वाढ होणार आहे. प्रशासनाने भीमे काठच्या व चंद्रभागा नदी काठच्या गावकऱ्यांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. उजनी व वीर धरणातून सोडलेले पाणी गुरुवारी दुपारपर्यंत पंढरपूर येथे पोहोचणार आहे. त्यावेळी 2 लाख 75 हजार क्यूसेस पाणी दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
भीमा व चंद्रभागेला येणार महापूर-
उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदीला व चंद्रभागा नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने सावधानतेच्या सूचना देत नदी काठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य सुरू केले आहे. पंढरपूर येथील नदीकाठच्या वस्त्यादेखील रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
पंढरपूर शहरालगत असलेल्या झोपडपट्ट्या व वसाहती रिकाम्या-
पंढरपूर शहरालगत असलेल्या झोपडपट्ट्या व वसाहती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये व्यास नारायण झोपडपट्टी,आंबेडकर नगर झोपडपट्टी,अंबाबाई पटांगण, गुरुदेव नगर आदी भागातील नागरिकांना लोकमान्य विद्यालय, केंद्रेकर महाराज मठ,तनपुरे महाराज मठ येथे स्थलांतरित केले आहे. मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर आणि प्रांत अधिकारी सचिन ढोले स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करत आहेत.