"वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या कार्यक्रमात पूर्वी कोणीतरी, 'पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो,' असे बोलले होते. त्यामुळे पवार साहेबांनी एक चूक केली. आता दुसरी चूक केली असे मी म्हणणार नाही," अशी अप्रत्यक्ष टीका मोदींवर नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच कमी जागांवर सत्ता आणण्याचा चमत्कार पवारांनी केला असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा- कोल्हापुरात विक्रीचे नियम न पाळल्याने पहिल्यांदाच मटण दुकानावर कारवाई
उद्धव ठाकरे हे आज (बुधवारी) पुण्यातील मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, साखर क्षेत्रातले आपल्याला फारसे कळत नाही. पण या क्षेत्रातील दिग्गज माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबतीने या क्षेत्रातील समस्या सोडवल्या जातील, माझे नवे सहकारी अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि इतरही मान्यवर लवकरच सोबत येतील. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा मराठवाड्यात सुरू करण्यासाठी जालना जिल्ह्यात जागा देण्याचे मागील सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. मात्र, आम्ही दिलेले शब्द पाळतो, असा चिमटा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेतला.
शेतकऱ्यांनी कमीतकमी जागेत जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घेतले म्हणून आपण त्यांना पुरस्कार दिले. पूर-दुष्काळ यावर मात करत तुम्ही शेतकऱ्यांनी हे यश मिळवले. शरद पवारांनीही असाच चमत्कार करून दाखवला आहे. कमीत-कमी जागांमध्ये त्यांनी सत्ता आणून दाखवली. मागील वेळी सरकारने काही आश्वासने दिली होती. आम्ही देखील सत्तेत होतो. पण अर्धवट होतो. म्हणजे आम्ही अर्धवट नव्हतो तर आमचा सहभाग अर्धवट होता. असे म्हणत त्यांनी जयंत पाटील यांना आपल्या कॅबीनेटमधे त्या जालन्यातील जागेची फाईल घेवून मंजूर करायला सांगितली.