दौंड - नवजात अर्भकाला टॉयलेटच्या भांड्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातील यवत मधील एका रुग्णालयामध्ये घडला आहे. या अर्भकावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले . याबाबत तीन व्यक्तींवर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस करत आहेत .
कंपाउंडरच्या पत्नीला दिसले अर्भक -
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ३१ डिसेंबरला यवत येथील या हॉस्पिटलमध्ये कंपाउंडरची पत्नी नेहमी प्रमाणे हॉस्पिटलमधील बाथरूम मध्ये गेली असता, तिला बाथरूम मधील टॉयलेटच्या भांड्यात एक नवजात अर्भक रडताना दिसले. यामुळे ती घाबरून डॉक्टरांकडे गेली आणि हा प्रकार सांगितला. यानंतर लगेच डॉक्टर आणि त्यांची पत्नी यांनी बाथरूममध्ये जाऊन पाहिले. यावेळी त्यांना एक पुरुष जातीचे नवजात अर्भक दिसले. अर्भकाचे डोके टॉयलेट होलच्या बाजूला आणि पाय वर अशा स्थितीत जिवंत दिसून आले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पोलिसांना याबाबत माहिती दिली.
रात्रीच्या सुमारास तीन व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आल्या होत्या -
३० तारखेला या रुग्णालयामध्ये रात्रीच्या सुमारास पोट दुखत आहे, म्हणून उपचारासाठी एक महिला आली होती. तिच्या सोबत एक महिला आणि पुरुष होते. डॉक्टरांनी पोट दुखत असलेल्या महिलेवर उपचार केले. यानंतर पोट दुखत असलेली महिला आणि तिच्या सोबतची महिला रुग्णालयामधील बाथरूम मध्ये गेल्या होत्या. यावेळी डॉक्टरांनी कंपाउंडरला पेशंट बाहेर गेले की रुग्णालयाचा दरवाजा बंद करून झोपीजा असे सांगून डॉक्टर घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कंपाउंडरची पत्नी रुग्णालयामधील बाथरूममध्ये गेली असता तीला नवजात अर्भक दिसून आले .
तीन व्यक्तिंवर संशय -
याबाबत सदर रुग्णालयाच्या डॉक्टराना उपचाराचा बहाणा करून आलेल्या तीन व्यक्तिंनी संगनमत करून, विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हे अर्भक टॉयलेट मध्ये फेकून दिल्याचा संशय आहे. या प्रकाराबाबत डॉक्टरांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. या बाबत यवत पोलीस अधिक तपास करत आहेत .