पुणे - येथील चाकण बाजार समितीमधील एका आडत्याला व नारायणगाव येथील व्यापाऱ्याकडील कामगाराला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे, कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी चाकण बाजार समिती 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी, आडते व बाजार समितीने घेतला आहे. संपूर्ण बाजारसमिती परिसर फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
चाकण बाजार समितीमध्ये खेड, शिरुर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातून भाजीपाला तरकारी मालाची मोठ्या प्रमाणात आवक असते. त्यामुळे बाजारसमितीमध्ये शेतकरी छोटे- मोठे व्यापारी यांचाही मोठ्या संख्येने सहभाग असतो. त्यामुळे बाजार समितीतील एका आडत्याला कोरोनाची लागण झाल्याने बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाग्रस्त आडती गेली दहा दिवस बाजार समिती परिसरात आला नाही. मात्र, तरीही खबरदारी म्हणून चाकण व नारायणगाव बाजार समिती निर्जंतुकीकरण करुन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन बाजारसमितीने केले आहे.
नारायणगाव बाजार समिती राहणार बंद तर, टोमॅटो मार्केट सुरू
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबजार असलेल्या नारायणगाव बाजारात एका व्यापाऱ्याकडे असलेल्या एका कामगारास कोरोनाची लागण झाल्याने तरकारी व भाजीपाला बाजार तीन दिवस बंद राहणार आहे. परंतु, टोमॅटो मार्केट सुरू रहाणार असल्याची माहिती आहे.