पुणे - कोथरूड परिसरातील म्हातोबादरा येथे अज्ञातांनी ९ दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. रविवारी पहाटे ४ च्या सुमारास हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-vhechial-burn-in-pune_22122019113832_2212f_1576994912_345.jpg)
कोथरूडमधील म्हातोबानगर येथे रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी अज्ञाताने जाळल्याची घटना घडली. यामध्ये ९ दुचाकी संपूर्ण जळून खाक झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने म्हातोबानगर येथील रस्त्याच्या कडेला शेजारी-शेजारी लावलेल्या दुचाकींना आग लावली. आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत या आगीची झळ ९ दुचाकींना बसली होती. नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी येऊन जळालेल्या दुचाकींचा पंचनामा केला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर भीषण अपघात; एक ठार, ५ जखमी
गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात दुचाकींना आग लावण्याचे प्रमाण वाढले आहे. कोथरूडमध्ये याआधीही असे प्रकार घडले आहेत. पोलिसांची गस्त सुरू असतानाही समाजकंटकांकडून असे प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
हेही वाचा - बारामतीत प्रलंबीत मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे धरणे आंदोलन