पुणे - चाकण उद्योगनगरी परिसरातून बिहार आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दोन आरोपींविरुध्द बिहार राज्यात बनावट कागपत्रे बनवणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश आणि इस्लामिक स्टेट ऑफ बांगलादेश या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचे हे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप या दोघांवर आहे.
चाकण येथून अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी चाकण परिसरात बांधकाम मजूर म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर यांना अटक झाल्याच्या घटनेला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.
चाकण औद्यौगिक परिसरात मोठ्या प्रमाणात लहान-मोठे उद्योग आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातील कामगारमिळेल त्या ठिकाणी काम करत आहेत. या कामगारांचे भाडेकरार आणि कागदपत्रे तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असुन पुढील काळात अशा विविध गुन्ह्यांची उकल होणार आहे.