पुणे- पुणे मेट्रोचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. लवकरात लवकर आता ट्रेन सेवा चाचणी सुरू करण्यासाठी महामेट्रो सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यामध्ये दोन मेट्रो ट्रेनचे संच २८ डिसेंबर रोजी पुण्यात दाखल होणार आहेत. हे दोन्ही संच आज नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाले आहेत.
प्रत्येक ट्रेनच्या संचामध्ये ३ कोच असणार आहेत. एका ट्रेनमध्ये ९५० ते ९७० प्रवाशी समावू शकतात. मेट्रो ट्रेनच्या ३ कोच पैकी १ कोच महिलांसाठी राखीव असेल. संपूर्ण मेट्रो ट्रेन वातानुकूलित असून त्यामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. हे तीनही डबे एकमेकांना जोडलेले असतील. त्यामुळे, प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये सहजगत्या जाऊ शकतील.
ट्रेनचे संच पूर्णतः स्टेनलेस स्टील या धातूपासून बनविले आहेत. वजनाला हलके असलेल्या या ट्रेन संचामध्ये अत्याधुनिक एलईडी प्रकारचे दिवे लावलेले आहेत. बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेने आतील दिवे आपोआप कमी अधिक तीव्र करण्याची यंत्रणाही ट्रनमध्ये आहे. ट्रेनचा अधिकतम वेग ९० किमी असणार आहे. ट्रेनमध्ये मोबाईल, लॅपटॉप, चार्जिंग सुविधा असून प्रवाशांसाठी दृकश्राव्य सूचनाप्रणाली असणार आहे.
हेही वाचा- एल्गार परिषदेच्या प्रकरणाची 'एसआयटी' तर्फे चौकशी व्हावी; शरद पवारांची मागणी