पुणे - सध्या कोरोना विषाणूमुळे अवघा भारत लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाजीचे मार्केट सुरूच आहेत. रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. अशात काही तळीराम भाजीच्या नावाखाली गावठी दारू दुचाकीवरून घेऊन जात असताना पिंपरी वाहतूक पोलिसांना आढळले. मग काय दिला पोलिसांनी चोप. एवढेच नव्हे तर त्याच्या तोंडाला मास्क नसल्याने त्याचा शर्ट काढून तोंडालाही बांधायला लावला.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने थैमान घातले तरी तळीरामांचे दारू पिणे चालूच.. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने शिरकाव केला असून १२ जण कोरोनाग्रस्त आढळले. त्यानंतर प्रशासनाकडून विविध उपाय योजना करण्यात आल्या. देशात जास्त प्रादुर्भाव झाल्याने अवघा देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु, काही नागरिक गाफील आहेत. भाजीपाला आणण्याच्या नावाखाली बाहेर पडून दारू नेत असल्याचे समोर येत आहे. आज (बुधवारी) पिंपरी येथील आंबेडकर चौकात दोन व्यक्ती हे दुचाकीवरून जात होते. त्यांना वाहतूक पोलिसांनी अडवले. पोलिसांनी कारण विचारले तेव्हा भाजी घ्यायला गेलो असल्याचे सांगत आपल्याकडील पिशवी दाखवली. मात्र, पाठीमागे बसलेल्या व्यक्तीकडे दुसऱ्या पिशवीत गावठी दारू असल्याचे पोलिसांना दिसले.
पोलिसांनी काठीने बॅगमधील गावठी दारूच्या बॉटल फोडून टाकली. तळीरामाने मास्कही बांधले नव्हते त्यामुळे त्याला शर्ट काढायला लावत, पोलिसांनी काठीने चोप दिला आणि शर्ट तोंडाला बांधायला लावला.