पुणे - येथील पिंपरी-चिंचवडमध्ये वेगवेगळ्या दोन घटनेत अपहरण करून खून केल्याची घटना घडली आहे. यात एका अडीच वर्षीय मुलीचा समावेश आहे. तिच्यासोबत काही अघटित घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर दुसऱ्या घटनेत हॉटेलमध्ये झालेल्या भांडणातून तरुणाचे अपहरण केल्यावर त्याचा खून करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चिमुकलीचे अपहरण केल्यावर तिचा खून करण्यात आला. ही घटना पहाटेच्या सुमारास समोर आली. रात्री मृत चिमुकली दीडच्या सुमारास बेपत्ता झाली होती. आईवडिलांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, २-३ तासांच्या अथक प्रयत्नानंतरही ही मुलगी भेटली नाही. यानंतर, सांगवी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर, पोलीस आणि आई वडील यांनी चिमुकलीचा शोध घेत असताना तेथील मिलिटरी सीमाभिंतीच्या पलीकडे असलेल्या पाणी साचलेल्या खड्ड्यात मृतदेह तरंगत असलेल्या अवस्थेत मिळाला. या घटनेनंतर संबंधित मुलीचा मृतदेह औंध येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. याप्रकरणी, पोलीस संशयित व्यक्तींची चौकशी करत आहेत.
तर, दुसऱ्या घटनेत हॉटेलमध्ये झालेल्या वादातून तरूणाचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. हितेश गोवर्धन मूलचंदानी (वय-२४ रा. पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, संशयित आरोपींना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन दिवसात हा तिसरा खून असल्याने पिंपरी-चिंचवड मधील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे शहरातील पोलीस प्रशासन काय करत आहे ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.