बारामती (पुणे) - इंदापूर येथील बाह्यवळणावर हायवा टिप्पर चालकाने वाहन मागे घेत दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराची पत्नी व पुतणी जागीच ठार झाले. प्रियंका सोमनाथ जाधव (वय १९ वर्षे ) ज्ञानेश्वरी किरण जाधव (वय २ वर्षे) असे अपघातात मृतांची नावे आहेत.
दुचाकीस्वार सोमनाथ रमेश जाधव (वय २४ वर्षे मूळ रा.चांदज, तालुका-माढा जि.सोलापूर, सध्या रा.घोडके नगर रुई ता. बारामती) यांनी अपघातात घडल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, पत्नी प्रियंका व पुतणी ज्ञानेश्वरी यांना घेऊन दुचाकी (एम.एच.४५ ए.के.७२१५ ) बारामतीहून मूळ गावी चांदज येथे भावाचे लग्न असल्याने जात होतो.
इंदापूर येथे चौकातून बाह्यावळणाच्या सेवा रस्त्याने जात असताना हायवा टिपर (क्रमांक एम.एच.४२ ए.क्यु .४०९७) हा जात होता. त्याच्या पाठीमागून चाललो असताना टिपर चालकाने अचानक ब्रेक दाबला. ट्रक रोडवरती उभा राहिल्याने पाठीमागे मोटरसायकलचा ब्रेक दाबला. मोटारसायकल उभी केल्यानंतरही हायवा टिप्पर चालकाने अचानक वाहन मागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी मोठमोठ्याने हॉर्न वाजवून आवाज दिला. पण चालकाने टिप्पर वेगाने मागे घेतला.
ड्रायव्हर बाजूचे चाक पत्नी व पुतणी यांच्या अंगावरून गेले
टिप्परने मोटरसायकलला उजव्या बाजूला धडक देऊन अपघात झाला. दुचाकी खाली पडल्यानंतर ड्रायव्हर बाजूचे चाक पत्नी व पुतणी यांच्या अंगावरून गेले. या अपघातात पुतणी ज्ञानेश्वरी ही जागेवरच मृत झाली. तर प्रियंका हिला इंदापुरात रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी दोघीही मृत झाल्याचे सांगितले.
हायवा टिप्प चालक सोमनाथ सुभाष राऊत (रा.बावडा ता.इंदापूर) यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.