पुणे - शहराजवळील पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे साने चौकातील पोलीस चौकीसमोर दोन गटाच्या वादात पोलिसांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्री दारू पिण्यासाठी बसले. त्यावेळी दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झाले. त्याबाबत साने चौकातील पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी ते सर्वजण आले होते. पोलीस उपनिरीक्षक यु. बी. ओमासे तक्रारदारांकडून त्यांच्या तक्रारीबाबत विचारपूस करत होते. त्यावेळी दोन्ही तक्रारदारांच्या बाजूने २५ ते ३० लोक जमा झाले. पोलीस चौकीसमोरच बेकायदेशीर जमाव जमवून एकमेकांना शिवीगाळ करू लागले. त्यानंतर थोड्याचवेळात दोन्ही गट आपापसात भिडले. यात पोलीस अधिकारी त्यांना समजवण्यासाठी गेले असता, त्यांनी पोलीस उपनिरीक्षक ओमासे आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.