पुणे - लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ इंदौर-दौंड एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना आज सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गेल्या एक तासापासून प्रवासी याठिकाणी अडकून पडले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर डबे रुळावर आणण्याचे काम सुरू आहे.
डबे रुळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर -
आज सकाळी पावणे आठच्या सुमारास इंदौर-दौंड या एक्सप्रेसचे दोन डबे हे रुळावरून घसरले. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, अपघातामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनांकडून घसरलेले डबे पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. लोणावळा रेल्वे स्थानकात येत असताना हा प्रकार घडल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. रेल्वे यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली असून डबे रुळावर घेण्याच काम सुरू आहे.
रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ -
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच नांदेडकडे येणाऱ्या रेल्वे मालगाडीचा एक डबा शिवणगाव रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून खाली उतरल्याची घटना घडली होती. शिवणगाव रेल्वे स्टेशन सिग्नलजवळ काही तांत्रिक कारणामुळे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यामुळे काही तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यंत्रणेने हा डबा पुन्हा रेल्वे रुळावर आणून रेल्वे सेवा सुरळीत केली.
हेही वाचा- शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद; जाणून घ्या 'त्या' तिन्ही कृषी कायद्यांविषयी