पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनामास्क नागरिकांवर पोलीस कारवाई करत असताना विनामास्क दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करत दमदाटी केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3 नोव्हेंबर) संध्याकाळी घडली असून दोघांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा सर्व प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे.
पिंपरीत टवाळखोरांची पोलिसांना दमदाटी करून शिवीगाळ या प्रकरणी मुख्य आरोपी अभिषेक राजू टेंकल (वय- 18 वर्षे, रा. शिवाजीनगर, पुणे) आणि हरिष गणेश कांबळे (वय 18 वर्षे, रा. शिवाजीनगर, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील कांबळे याच्यावर यापूर्वी आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत. मंगळवारी (दि. 3 नोव्हें.) रात्री सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे सौदागर येथे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत होते. तेव्हा, दोन्ही आरोपी हे दुचाकीवरून जात होते. त्यांनी मास्क घातले नसल्याने त्यांना पोलिसांनी अडवले. मात्र, त्यांना सहकार्य न करता थेट पोलिसांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जात दमदाटी केली आहे. हा सर्व प्रकार तेथील एका नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे. प्रत्येक शब्दाला पोलीस कर्मचाऱ्याला मुख्य आरोपी टेंकल हा शिवीगाळ करत होता. सांगवी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा - डेक्कन परिसरात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 12 जणांवर गुन्हा