पुणे - रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पृथ्वीराज संदीप मुळीक (वय 22, रा. साई प्रसाद सोसायटी दत्तनगर पुणे) आणि नीलिमा किसन घोडेकर (गोल्डन केअर, हॉस्पिटल भुमकर चौक, हिंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी नीलिमा ही गोल्डन केअर हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक व्यक्ती रेमडेसीवीर इंजेक्शन जास्त किमतीमध्ये विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर यांना बनावट ग्राहक बनवून इंजेक्शन खरेदी करण्यासाठी पाठवले. यावेळी आरोपी पृथ्वीराज मुळीक हा जास्त किमतीत इंजेक्शन विकताना आढळला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हे इंजेक्शन त्याची मैत्रीण नीलिमा घोडेकर हिच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणात आणखीही काही आरोपी असून त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी हाती घेतली मोहीम -
पुणे शहरातील रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पुणे पोलिसांची दहा पथके कार्यान्वित झाली आहेत. इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी पुणे पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.
हेही वाचा - रेमडेसीवीरचा काळाबाजार केल्याप्रकरणी चौघांना अटक; पुण्यात इंजेक्शनची रिटेल विक्री बंद