पुणे : पुण्यातील विश्रामबाग पोलिसांकडून वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. या दोघांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोघे यामाहा आर एक्स 100 यामाहा गाडी चोरी करत होते. या कारवाईत पोलिसांकडून तब्बल 16 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दोघांना अटक: अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आदित्य दत्तात्रय मानकर (19 वर्षे, रा. उरुळी कांचन), मयूर उर्फ भैया पांडुरंग पवार (20 वर्षे, रा. उरळीकांचन) आहे. चोरांकडून तब्बल साडेचार लाख रुपये किमतीच्या 17 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी 17 गुन्हे उघडकीस आले आहेत.
या कंपनीच्या गाड्या निशान्यावर : पुण्यातील अतिशय रहदारी असणाऱ्या बाजारपेठा ज्या ठिकाणी आहेत त्या पेठ भागांमध्ये हे चोर रात्रीच्यावेळी चोरी करायची. यापैकी दोघांचे काम हे गाड्या बघणे, चोरणे आणि त्या मार्केटमध्ये विकणे हे होते. यातील एकजण या गाड्या लपवून ठेवत असे, अशी माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली. विशेष म्हणजे हे दोन्ही चोर कुठलीही दुसरी चोरी करायचे नाही. ते फक्त आर एक्स 100 यामाहा गाड्या चोरायचे आणि त्यानंतर त्याची बाजारात विक्री करायचे.
अन्य गाड्या चोरल्याचा संशय: या चोरांकडून आणखी काही गाड्या विकल्या गेल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. या संदर्भातील सर्व माहिती विश्रामबाग पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली आहे.
चोरीची गाडी घेऊन पाहुण्यांच्या भेटीला: कधी-कधी चोरटे स्वतःहून पोलिसांच्या तावडीत सापडतात,असाच काहीसा प्रसंग सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या पिंपरी खुर्द या ठिकाणी घडला आहे. एका चोरट्याने एक दुचाकी चोरली आणि त्यानंतर तो त्याच्या पाहुण्यांना भेटायला ज्या गावी गेला. त्या गावातल्या एका सेवानिवृत्त जवानाची ती गाडी निघाली. मग गावकऱ्यांनी चोरट्याला आणि गाडीलाही पकडलं व थेट पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. मात्र या दुचाकी चोरट्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेची तालुक्यात खुमदार चर्चा झाली.
पोलिसात फिर्याद दाखल: पिंपरी खुर्द येथील सेवा निवृत्त जवान बाबासाहेब गणपत काटे हे पंधरा दिवसांपूर्वी कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून आटपाडी येथे गेले होते. यावेळी काटे यांनी आपली दुचाकी बसस्थानकात उभी केली. काही वेळाने चोरटाने त्यांची दुचाकी लंपास केली. याबाबत त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा शोध घेतला. पण गाडीचा शोध लागला नाही चोरीला गेलेली गाडी चोरट्यांनी थेट गावात आणून दिली.