पुणे - जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील अंबोडी येथे तीन दिवसांपूर्वी एका दोन दिवसाच्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- 28 ऑक्टोबरला घडला होता प्रकार
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, 28 ऑक्टोबरला पुरंदर तालुक्यातील अंबोडी येथे वनविभागाच्या हद्दीजवळ असलेल्या शेतात एका दोन दिवसाच्या अर्भकाला दोघांनी जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक शेतकऱ्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर या व्यक्तींनी तेथून धूम ठोकली होती. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाल होता.
- माहिती नसतानाही पोलिसांनी लावला छडा
या घटनेतील आरोपींची पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती तसेच पुरावेही नव्हते. मात्र, यानंतर सुद्धा सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त माहिती मिळवून पोलिसांनी अरबाज इक्बाल बागवान आणि अनिकेत संपत इंगोले (दोघे रा. सासवड) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
- प्रेमसंबंधातून झाला होता मुलाचा जन्म
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरबाज बागवान याचे 21 वर्षीय तरुणीसह प्रेमसंबंध होते. यातून या मुलाचा जन्म झाला. एका रुग्णालयात दोघे नवरा-बायको असल्याचे भासवून त्यांनी प्रसुती करून घेतली. यानंतर हे बाळ मी सांभाळतो असे म्हणून पीडित मुलीकडून हे अर्भक अरबाज याने घेतले होते. यानंतर त्याने मित्र अनिकेत इंगोले त्याच्याबरोबर आंबोडी येथील शेतात जाऊन हे बाळ पुरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी पाहिल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला होता.
- तीन दिवसांत पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
या घटनेने पुरंदर तालुक्यामध्ये खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास तातडीने लागावा म्हणून पोलिसांवर मोठा दबाव होता. सासवड पोलिसांनी तीन दिवसांतच या घटनेचा छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा - तीन दिवसाच्या बाळाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न, शेतकऱ्याच्या सतर्कतेने वाचले प्राण