पुणे - जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण फाटा येथे पावसाने रस्ता खचला आहे. रस्त्याचे नव्यानेच डांबरीकरण झाले असून त्यात साईड पट्टी न भरल्याने रस्त्याच्या बाजूचा भरावा वाहून गेल्याने हा रस्ता दोन ते तीन फुट खाली खचला आहे. पावसाचा जोर आजून वाढला तर रस्ताच वाहून जाण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोरघर ते आहुपे हा ३२ किमी रस्त्याच्या कामासाठी १५ कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. हे रस्त्याचे काम पाच महिन्यांपूर्वी करण्यात आले. परंतु पहिल्या पावसातच माळीण फाटा येथील रस्ता सुमारे दोन फुट खाली खचला आहे.
हेही वाचा-अमृतसरमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांचे जोरदार स्वागत, शेअर केला व्हिडिओ
पुन्हा माळीणची पुनरावृत्ती होण्याची ग्रामस्थांमध्ये भीती-
बोरघर ते आहुपे रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधीतून बोरघर, अडिवरे, माळीण, पंचाळे, कोंढरे, न्हावेड, नानवडे, अघाणे, पिंपरगणे, डोण, तिरपाड, आहुपे आदि गावांना व परिसरातील आदिवासी वाडयावस्त्यांना रस्त्यासाठी सुमारे १५ कोटी रूपयांच्या निधीची मंजुरी मिळाली होती. या निधीतून बोरघर ते आहुपे या ३२ कि.मी. रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणाचे काम करण्यात आले. परंतु या रस्त्याच्या कडेचे गटर व साइड पट्टयाचे काम करताना काही अडचणी येत असल्याने संबंधित काम बाकी आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. पुन्हा माळीणची पुनरावृत्ती होती की काय, अशी भीती स्थानिकांच्या मनात दिसून येत आहे.
हेही वाचा-हा धडा आहे, तुम्ही श्रीमंत असताना पैसे कसे खर्च करू नये, आनंद महिंद्रांच्या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा
2014 ला माळीणमध्ये घडली होती दुर्दैवी घटना
सात वर्षापूर्वी मन सुन्न करणाऱ्या पहाटेची आजही आठवण काढली की माळीणमधील ग्रामस्थांच्या अंगावरती शहारे उभे राहतात. सात वर्षापूर्वी काही क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले होते. माळीण हे संपूर्ण गाव दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. यामध्ये तब्बल 151 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 900 पेक्षा जास्त मुक्या प्राण्यांचाही यात मृत्यू झाला होता. 30 जुलै 2014 रोजी सात वर्षापूर्वी माळीण गावावर ती पहाट काळाचा डोंगरच ठरली. आजही येथील लोकांच्या मनात या दुर्घटनेमुळे भीती आहे. राज्यातच नाही तर संपूर्ण देशात या दुर्घटनेनंतर हळहळ व्यक्त झाली होती.