पुणे : महात्मा गांधींबद्दल नेहमीच वादग्रस्त विधाने करणाऱ्या संभाजी भिडे यांना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण, गांधी कुटुंबाबद्दल अमरावतीत वादग्रस्त विधान केल्याने महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसात तक्रार देताना तुषार गांधी यांच्यासमवेत वकील असिम सरोदे, कुमार सप्तर्षी, डॉ. विश्वंमभर चौधरी, अन्वर राजन, प्रशांत कोथंडीया, संकेत मुनोत व इतर गांधीवादी लोक उपस्थित होते. महात्मा गांधी यांची बेअब्रू व स्त्रियांची बदनामी करणाऱ्या वक्तव्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी तुषार गांधी म्हणाले की, भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर लांछन लावले आहे. त्यामुळे मला स्वतःला दुःख झाले आहे. त्यांनी जे वक्तव्य केले, ते पाहून मी येथे तक्रार द्यायला आलो आहे. हा एक सायबर गुन्ह्याचा देखील प्रकार आहे. आज संभाजी भिडे तसेच त्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली आहे, असे तुषार गांधी यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री यांचे पाय कोणी बांधून ठेवले - गांधी पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत भिडे यांनी वेळोवेळी महात्मा गांधी यांच्या विरोधात विधाने केली आहेत. पण आता त्यांनी थेट बापूंच्या आईबाबत विधान केले आहे. त्यामुळे माझ्या परिवाराचा अपमान केला आहे. त्यामुळे मी स्वतः ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी केलेल्या विधानाला एक महिना होऊनही कारवाई का होत नाही, उपमुख्यमंत्री यांचे पाय कोणी बांधून ठेवले आहेत, हे अजूनही कळत नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे आज त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
चौकशी करून गुन्हा नोंद करण्याचे पोलिसांचे आश्वासन - यावेळी असीम सरोदे म्हणाले की, महात्मा गांधी, लोकशाही संविधान मानणाऱ्या लोकांच्या विरोधात भेदभाव निर्माण करणे आणि 505 कलम गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा करणे तसेच सर्वांनी मिळून अशा पद्धतीचे कृत्य करणे म्हणून कलम 34 लावावे आणि 153 ए नुसार समाजात तेढ निर्माण व्हावी म्हणून गुन्हा नोंद करण्यात यावा, अशा पद्धतीची विनंती पोलिसांना करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत चौकशी करून गुन्हा नोंद करू, असे सांगितले आहे.
समाजात शत्रुत्व पसरवणे यानुसार गुन्हा नोंदवावा - पुढे सरोदे म्हणाले की, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी तसेच गांधीवादी लोक यांच्याकडून संभाजी भिडे, कार्यकर्ते व अमरावती येथील कार्यक्रमाचे आयोजक यांच्या विरोधात डेक्कन पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली आहे. या तक्रारीत तुषार गांधी हे स्वतः गांधी परिवारातील पणतू आहेत. कलम 499 अब्रू नुकसानी करणे, अपमान करणे आणि स्त्रीत्वचा अपमान करणे तसेच 153 अ समाजात शत्रुत्व पसरवणे यानुसार गुन्हा नोंदवावा, अशी पोलिसांना विनंती केली आहे.
हेही वाचा-