पुणे - राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ तुळशीबागही पुढील 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांच्या आवडीचे व हक्काचे ठिकाण असलेले तुळशीबाग पुढील 3 दिवस बंद राहणार आहे. तर तुळशीबाग बंद ठेवण्यासाठी विश्रामबाग पोलिसांनी केलेल्या आवाहनास तुळशीबाग छोटे व्यापारी असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री 8 वाजता दुकानदार व छोटे व्यावसायिक असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी तुळशीबागेतील ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन, पुढील 3 दिवस तुळशीबाग बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत छोटे व्यापारी असोसिएशनने तुळशीबाग बंद ठेवली आहे.
हेही वाचा - 'एफटीआयआय'च्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय चित्रपटसृष्टीचा चित्ररूपी इतिहास पाहण्याची संधी