पुणे - तीन दिवसाच्या नवजात अर्भकाला दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी खड्डा करून त्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला. पण, काही शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्या दिशेने धाव घेताच आरोपी त्या बाळाला तिथेच सोडून पसार झाले. पुरंदर तालुक्यातील आंबोडी गावात हा प्रकार घडला. सासवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंबोडी येथील एका शेतामध्ये दोन तरुण शेतात खड्डा खोदत होते. परिसरातील शेतात काम करणारे काही शेतकरी त्या ठिकाणी आले असता त्यांना याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी लांबूनच त्यांना काय करताय? हे विचारले. मात्र, यानंतर त्यांनी तेथून दुचाकीसह पळ काढला. मात्र, जाताना ते अर्भक तिथेच सोडून दिले. यानंतर या नागरिकांनी सासवड पोलिसांना याबाबत माहिती दिली.
यानंतर सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी साधारण तीन दिवसाचे जिवंत अर्भक असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या अर्भकाला ताब्यात घेतले असून त्याला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथील तपासणी नंतर या अर्भकाला पुणे येथे ससून रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.
हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मलेले असावे. म्हणून आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने या बाळाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला असावा. त्या दृष्टीने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळले स्त्री जातीचे जिवंत अर्भक