पुणे - राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त शिक्षक आमदार कपिल पाटील आणि सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे सेवा दल स्वयंसेवकांनी उपोषणाचे हत्यार उचलले आहे. पुण्यातल्या राष्ट्र सेवा दलाचे कार्यालय असलेल्या साने गुरुजी स्मारकात काही स्वयंसेवकांनी उपोषण सुरू केले आहे.
राष्ट्र सेवा दलाच्या विश्वस्तांवर आरोप
राष्ट्र सेवा दलाचा आज (4 जून) स्थापना दिवस आहे. मात्र, याच दिवशी राष्ट्र सेवा दलातल्या स्वयंसेवकांचा असंतोष उफाळून आला आहे. 'राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त असलेले शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सेवा दलाला काँग्रेसच्या दावणीला बांधले आहे', असा आरोप सेवादल स्वयंसेवकांनी केला आहे.
'कपिल पाटलांनी त्वरीत राजीनामा द्यावा'
'विश्वस्त असलेल्या कपिल पाटील यांनी विनाविलंब राजीनामा द्यावा. सोबतच राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय अध्यक्षांनी सन 2019-22 कालावधीसाठी नियुक्त केलेली राष्ट्रीय कार्यकारिणी असंविधानिक आहे. ही कार्यकारणी त्वरीत बरखास्त करावी. सेवा दलात क्रियाशील सदस्य नसलेल्यानी स्वतःहून पदे सोडावीत. संघटनेतील आर्थिक उधळपट्टी त्वरीत थांबवावी', अशी मागणी सेवा दलातील स्वयंसेवकांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्र सेवा दलाच्या सर्व प्रकल्पांचे, मालमत्तांचे हस्तांतरण किंवा स्थलांतरण थांबवावे, अशा मागण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे.
हेही वाचा - शिवराज्याभिषेक दिनी जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीवर भगवा लावणे चुकीचे -अॅड. गुणरत्न सदावर्ते