पुणे Ali Daruwala on Petrol Pump : केंद्र सरकारच्या नवीन कायद्याच्या विरोधात पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. राज्यभरात आजपासून तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा सर्वत्र पसरली आहे. त्यामुळं सोमवारी रात्री पुणे शहरासह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी पंपावर गर्दी केली. मात्र आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील, असं स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिलं आहे.
संपाचा पेट्रोल पुरवठ्यावर परिणाम नाही : याबाबत अली दारूवाला म्हणाले की "आज शहरातील सर्व पेट्रोल पंप खुले राहतील. संपूर्ण भारतातील वाहतूकदारांच्या संपाचा पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही. जिल्हा प्रशासनानं पेट्रोलियम पदार्थांच्या रिफिलिंगसाठी पेट्रोलियम टँकरना पोलीस संरक्षण दिलं आहे. त्यामुळं पेट्रोलचे ट्रक पोलीस संरक्षणात सर्व पंपावर येणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत" असंही दारूवाला यांनी यावेळी सांगितलं.
ट्रक चालकांच्या संपानं पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा : केंद्र सरकारनं नवीन कायदा केला असून त्या कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. ट्रक चालकांच्या या संपामुळं व्यापार ठप्प झाला आहे. ट्रक चालकांच्या संपामुळं पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळं पुण्यातील आणि पिपरी चिंचवड परिसरातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली होती. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेनं नागरिकांमध्ये पेट्रोल खरेदीसाठी झुंबड उडाली.
ट्रक चालकांचा संप : केंद्र सरकारनं केलेल्या नवीन कायद्याच्या निषेधार्थ ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. अपघातानंतर जखमी नागरिकांना सोडून पळाल्यास 10 वर्ष शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे. केंद्र सरकारनं रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी केलेल्या या कायद्याचा ट्रक चालकांना मोठा फटका बसू शकतो, अशी ट्रक चालकांची धारणा झाली आहे. त्यामुळं ट्रक चालक केंद्र सरकारविरोधात संप करत आहेत.
हेही वाचा :