पुणे - रेल्वे स्थानक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणांचा संपर्क टाळा, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना संदर्भात प्रशासनाच्यावतीने सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर बोलत होते.
दूध, धान्य, भाजीपाला, किराणा आणि औषधी अशा जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याबाबतच्या सूचना पणन विभागाच्या अधिकाऱयांसह संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. एन-95 मास्क आणि सर्जिकल मास्क उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. दोन हजार नवीन एन-95 मास्क उपलब्ध झाले आहेत. सद्यस्थितीत आवश्यक असलेल्या आणि भविष्यातील आवश्यकता विचारात घेता अतिरिक्त औषधांचा साठा करण्याबरोबरच औषधींची कमतरता भासणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. शिक्षण संचालकांशी चर्चा करुन प्रवाशांच्या विलगीकरणासाठी अतिरिक्त वसतिगृह उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.
हेही वाचा - निर्भया बलात्कार प्रकरण: संपूर्ण देशाला हादरवणारी घटना.. नेमकं काय घडलं होतं 'त्या' काळरात्री?
एकूण 26 शिक्षण संस्था प्रमुखांशी चर्चा करुन पाच हजारांपेक्षा जास्त व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील गर्दी टाळण्यासाठी बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. परिस्थिती लक्षात घेत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील सेतू, महा ई-सेवा केंद्रे आणि मालमत्तेची नोंदणी प्रकिया पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे.