बारामती - विनापरवाना जिलेटीन कांड्या व डिटोनेटरची वाहतूक करत नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला बारामती शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ट्रॅक्टरसह जिलेटिन कांड्या व डिटोनेटर हे स्फोटक पदार्थ असा ३ लाख ४ हजार रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला. विशाल ज्ञानदेव कोळेकर (रा.नांदल, ता.फलटण जि. सातारा ) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी रुपेश साळुंके यांनी फिर्याद दाखल केली.
चालकाकडे स्फोटक पदार्थ वाहतुकीचा परवाना नव्हता-
बारामती येथील पिंपळी ते डोरलेवाडी रस्त्यावर एक जण त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरमधून स्फोटक पदार्थाचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल दुपारी बाराच्या दरम्यान सापळा रचला. दरम्यान, एक ट्रॅक्टर येताना दिसला असता पोलिसांनी तो थांबवला. या ट्रॅक्टरची पाहणी केली असता एका प्लास्टिक पिशवीत खाकी रंगाच्या कागदात चार बॉक्स डिटोनेटर वायर तसेच जिलेटिन कांड्या मिळून आल्या. चालकाकडे स्फोटक पदार्थ वाहतुकीचा परवाना नव्हता. तसेच या पदार्थाची बिलेही त्याला सादर करता आली नाहीत. पोलिसांनी त्याच्याकडून १५४ जिलेटिन कांड्या व २०० डिटोनेटर तसेच ट्रॅक्टर जप्त केला कोळेकर यांच्या विरोधात स्फोटक द्रव्य आधिनियमांसह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- LIVE UPDATE- पूजा चव्हाण प्रकरणात अखेर संजय राठोड यांचा राजीनामा