पुणे - कोरोना विषाणूचा संसर्ग पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत ससून रुग्णालयाच्या कारभारावर टीकेची झोड उठत होती. याच पार्श्वभूमीवर आता बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता आणि ससूनचे प्रमुख डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केली गेली आहे. त्यांच्याकडून ससूनचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
डॉ. चंदनवाले यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याच्या सहसंचालक पदाचा पूर्णवेळ कार्यभार देण्यात आला आहे. चंदनवाले यांच्याकडे सहा महिन्यापूर्वीच हा कार्यभार सोपवण्यात आला होता. तसेच जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र, सहा महिन्यात पुन्हा त्यांची बदली करत ससूनचाही कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. दरम्यानच्या काळात ससून रुग्णालयातील रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, नातेवाईंकाना मिळणाऱ्या वागणुकीवरून नाराजी होती. त्यातच कोरोनाचा पुण्यात संसर्ग वाढल्यानंतर ससून रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आणि रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने रुग्णालय प्रशासनावर सडकून टीका झाली.
स्थानिक काँग्रेस नगरसेवकांनीदेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे डॉ. चंदनवाले यांच्या कारभाराबाबत तक्रार केली होती. एकंदरीतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेल्या या नाराजीतून डॉ. चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केली गेल्याची चर्चा आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण हे अंतिम टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याने डॉक्टरांना उपचाराची संधी मिळत नसल्याचे बोलले जात आहे. याच कारणामुळे ससूनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचेही सांगितले जात आहे.