पुणे - ख्रिसमस नाताळ, शनिवार व रविवार अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नाताळ असल्याने आज सुट्टी आहे. शिवाय शनिवार आणि रविवार असल्याने सलग सुट्ट्या मिळल्या आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात घरांच्या बाहेर पडले आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा रांगा लागल्या असून वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करत असल्याचे दिसत आहे. लोणावळ्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईहून लोणावळ्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
दरवर्षी पहायला मिळते पर्यटकांची गर्दी -
लोणावळा हे अनेकांचे लाडके पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी हजारो पर्यटक ख्रिसमस नाताळ आणि नूतन वर्षाच्या स्वागतासाठी येथे येतात. परंतु, यावर्षी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. कोरोनाने थैमान घातले आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन विषाणूमुळे महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रामध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तरीही मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत.
लोणावळ्यात नाईट कर्फ्यू -
राज्य सरकारच्यावतीने लोणावळ्यात देखील नाईट कर्फ्यू लावण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला असून 25 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत लोणावळ्यात हा कर्फ्यू लागू असणार आहे. रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंतकर्फ्यू आहे. मात्र, तरीही पर्यटकांचा ओघ लोणावळ्याच्या दिशेने असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे लोणावळा पोलिसांची काही प्रमाणात डोकेदुखी वाढू शकते.