पुणे - शनिवार आणि रविवार विकेंडचा दिवस असल्याने पुणे जिल्ह्यातून लोणावळा परिसरात हजारो पर्यटक दाखल झाले होते. भुशी डॅम येथे सर्वाधिक पर्यटक पाहायला मिळाले. तर आगरी कोळी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवी, कार्ला येथेदेखील भाविकांचा जनसागर लोटला होता. यावेळी दोन्ही ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा असल्याचे पाहायला मिळाले.
पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी डॅमवर आज पर्यटकांचा महापूर पहायला मिळाला. लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. लोणावळा शहराचे आकर्षण असलेल्या भुशी धरणावर भिजण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. लोणावळा शहर पोलिसांचा बंदोबस्त जागोजागी असल्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर वचक राहिला.
दरम्यान, आई एकविरा देवीच्या कार्ला गडावरही दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. सलग आलेल्या सुट्ट्यांचे औचित्य साधत एकविरा देवी गडावर भाविकांनी तसेच पर्यटकांनी मोठी गर्दी केली. आगरी कोळी समाजाचे श्रद्धास्थान एकविरा देवी असल्याने बारमाही दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. या गर्दीमुळे व्यापाऱ्यांमध्ये मात्र आनंदी वातावरण आहे.