पुणे - येथील शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात टोमॅटोचे सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ते उत्पादन नारायणगाव येथील बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन येथील टोमॅटो संपूर्ण जगभरात विक्रीसाठी जातो. आता या टोमॅटोने भाव खाल्ला आहे. ७० ते १०० रुपये प्रति किलोप्रमाणे टोमॅटोला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्याच्या पावसामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट होत असून काही प्रमाणात टोमॅटोचे नुकसान होत आहे.
टोमॅटोचे बाजार भाव कधी गगनाला भिडतात तर कधी कवडीमोल किमतीने टोमॅटोची विक्री होते. तर कधी वातावरणातील बदलांमुळे व रोगराईमुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये नारायणगाव बाजारात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असून शेतकरी आनंदित आहे. मात्र, चांगला बाजारभाव मिळवूनही उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च पाहता मिळत असलेला बाजार भाव हा वाढीव नसल्याचे शेतकरी सांगतात.