पुणे: सध्या गेल्या काही दिवसांपासून टॉमॅटोने मार्केट खाल्ला असून बाजारात आजही टोमॅटो 80 ते 100 रू किलोने मिळत आहेत. गेली दोन वर्षे टोमॅटो या पिकाला बाजारभाव न मिळाल्याने अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटो उत्पादक शेतकरी भरघोष पैसा कमावत आहे.
टोमॅटोच्या शेतीने बनविले करोडपती: जुन्नर तालुक्यातील पाचघर हे गाव असून या गावातील ईश्वर गायकर हे शेतकरी याच गावात राहतात. त्यांची या गावात परंपरागत 18 एकर क्षेत्र बागायती आहे. त्यापैकी बारा एकर क्षेत्रावर गायकर यांनी यंदाच्या वर्षी टोमॅटोची लागवड केली आहे. ईश्वर आणि त्यांची बायको सोनाली हे या शेतात सातत्याने काम करतात. दोन्ही नवरा-बायकोने केलेल्या मेहनतीने त्यांना करोडपती बनवले आहे.
एकाच दिवशी 900 कॅरेटची विक्री: आतापर्यंत त्यांनी महिनाभरात जवळपास 13 हजाराहून अधिक टोमॅटो कॅरेट विक्री केले असून त्यातून त्यांना सव्वा कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी एकाच दिवशी 900 कॅरेटची विक्री केली. त्यातून त्यांनी एकच दिवशी 18 लाख रुपये मिळाले आहेत. या जोडप्याला जुन्नर तालुक्यातील नारायण गांव येथील टोमॅटो मार्केटमध्ये एका कॅरेटला 1000 ते 2500 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.
१०० हून अधिक महिलांना रोजगार: यंदाच्या वर्षी टोमॅटो बागांची मशागत, तोडणी, क्रेट भरणे, फवारणी यांचे व्यवस्थापन ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर यांनी केले होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन तर चांगले बसले; पण या टोमॅटोमुळे जवळपास १०० हून अधिक महिलांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. त्यांनी तीन ते चार महिन्यांच्या केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे ईश्वर गायकर यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: