दौंड (पुणे)- सोलापूर महामार्गावर मस्तानी तलावाच्या विरुद्ध बाजूस एमक्युअर कंपनीचे कामगार घेऊन जाणारी बस, ट्रक आणि पीकअप अशा तीन वाहनांचा विचित्र झाला. या अपघातात बसमधील एक जण जागीच ठार झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आणि पाटस पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. योगेश मुसमाळे असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वाहन चालकांची बाचाबाची अपघातास कारणीभूत
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोल नाक्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मस्तानी तलाव आहे. या तलावाच्या विरुद्ध बाजूस आज (19 मे) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महामार्गावर कंपनी कामगारांना घेऊन जाणारी बस आणि केळी वाहतूक करणारा पिकअप यांच्या चालकात बाचाबाची झाली होती. दोन्ही वाहने महामार्गावर उभा होती. यावेळी पाठीमागून भरधाव येणारा ट्रक आणि या वाहनांचा अपघात झाला. या अपघातात बसमधील कंपनी कामगार बसमधून खाली पडला. जबर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तीन जण गंभीर जखमी
हा अपघात पिकअप (एम एच 13 आर 7497), भारत बेंझ ट्रॅव्हल्स (एम एच 14 GU 1715) आणि ट्रक (MH 12 MV5597) या तीन गाड्यांमध्ये झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. ओमप्रकाश यादव (रा. हडपसर), हिमेश चव्हाण (रा. पुणे) आणि बस चालक मनोहर बंडगर अशी जखमींची नावे असल्याचे उपस्थितांनी सांगितले आहे. यातील दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पिकअपमधील केळीचे कॅरेट महामार्गावर सर्वत्र पसरले होते.
ट्रक चालकास घेतले ताब्यात
अपघातामधील जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. मृतदेह दौंड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच सर्व गाड्या बाजूला केल्या असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे. ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली.
हेही वाचा - पाण्याचा टँकर पुरवण्याच्या वादातून व्यावसायिकाची कोयत्याने वार करुन हत्या, बघा सीसीटीव्ही फुटेज