पुणे - पुणे तिथे काय उणे असे नेहेमी म्हटले जाते आणि याची प्रचिती वेळोवेळी येतच असते. पुणे शहरात काहींना काही वेगळ्या संकल्पना, पुणेरी डॉयलॉग, पुणेरी कट्टा सुरूच असतात. अशीच काहीशी वेगळी कल्पना घेऊन उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येत जॉब न करता वेगळा व्यवसाय सुरू केला. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग अनेकांना दररोरोज सकाळी उठल्यानंतर चहाबरोबर चपाती लागते. अशीच या चहा चपातीची आवड पाहता अक्षय भैलूमे, अक्षय चव्हाण, धनश्री पाटील या तीन उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येत चहाचपातीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या भन्नाट कल्पनेला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद देखील मिळत आहे.
का सुरू केली चहा चपाती ?
पुणे शहरात ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. ग्रामीण भागात रोज सकाळी चहाबरोबर चपाती खाल्ली जाते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना अशा पद्धतीची चहा-चपाती मिळत नाही. त्यामुळे त्यांनी मिळेल ते खावे लागत होते. त्यानंतर आम्ही तिघांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी न करता महाविद्यालायजवळ चहा-चपातीचे हॉटेल सुरू केले, अशी प्रतिक्रिया अक्षय भैलूमेने दिली.
दररोज 40 हून अधिक चपाती विकले जातात
चहा चपातीचा हा व्यवसाय दोन दिवसांपूर्वीच झाले सुरू असून 4 प्रकारच्या चपात्या ग्राहकांना दिल्या जातात. दररोज 40 हून अधिक चपात्या विकल्या जात आहेत. पुणेकर चहा चपाती खायला चांगला प्रतिसाद देत असून शहराच्या विविध ठिकाणांहून नागरिक या चहा-चपाती खाण्यासाठी येत आहेत. येणाऱ्या काळात 12 प्रकारच्या चपात्या करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे अक्षय चव्हाण याने सांगितले.
खचून न जाता नवीन पर्याय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे अनेक तरुण हे बेरोजगार झाले तर काहीचे व्यवसाय हे डबघाईला आहे. मात्र, अशा परिस्थितीत नोकरी न करता मराठी माणसाने व्यवसायात पुढे जावे हा विचार करून आम्ही हा व्यवसाय सुरू केला आहे. हाच व्यवसाय पुढे वाढणार असल्याचे अक्षय चव्हाणने सांगितले.
हेही वाचा - पुणे महापालिकेच्या वतीने शिवनेरीवर साकारण्यात येणार जिजाऊ-शिवबाचे शिल्प