बारामती - तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात महिलांची सुमारे तीन कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील विठू माऊली गृहउद्योगमध्ये महिलांना मेणबत्त्या व्यवसायाचे काम केले. मात्र, त्यांना काम करूनही कामाचा मोबदला दिला नाही. धक्कादायक बाब म्हणजे अजित मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमधून या महिलांच्या नावे प्रत्येकी वीस हजार रुपयांचे परस्पर कर्ज घेऊन फसवणूक केल्याची महिलांची तक्रार आहे.
हेही वाचा - रेल्वे महाव्यवस्थापक रेणू शर्मांकडून बारामती रेल्वे स्थानकाची पाहणी
मेणबत्ती व्यवसायासंबंधी माहिती देणारे अभिजीत डोंगरे, राजन भिसे या दोघांनी फसवणूक केल्याचे महिलांनी सांगितले आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलांनी बारामती तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन दिले आहे. तत्पूर्वी या महिलांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आणि इतर सरकारी यंत्रणांना फसवणूक झाल्याची माहिती दिली असून न्याय देण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा - दौंड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढवण्यासाठी नागरिकांचे आंदोलन
शेतात मजुरी करून उपजिविका करणाऱ्या महिलांनी संसाराला हातभार लागावा म्हणून विठू माऊली गृह उद्योगात घरबसल्या मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, या महिलांची घोर फसवणूक झाली असल्याने गरीब कुटुंबातील या महिला पुरत्या हतबल झाल्या आहेत. याबाबत लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष कैलास सकट आणि महिलांनी तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन दिले आहे.