पुणे - पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून 28 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून आणि कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केला गेला आहे. ही घटना पुण्यातील येरवडा परिसरात सोमवारी रात्री घडली. घटनेत प्रतीक हनुमंत वन्नाळे (वय 28) या तरुणाचा मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील पंचशील नगर येथील एका मोकळ्या मैदानात भांडणे सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस घटनास्थळी रवाना झाले. यावेळी प्रतीक वनाळे हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. गंभीर जखमी अवस्थेत प्रतीक याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पोलिसांनी केलेल्या तपासात दोन गटात झालेल्या वादातून प्रतीक याच्यावर कुऱ्हाड व दगडाने हल्ला केल्याची माहिती मिळाली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.