पुणे : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. ते म्हणाले की जे कोणी म्हणत आहे की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते त्यांची कदाचित सुंता झाली असती. त्यांनी जाऊन चेक करावे अशी टीका यावेळी पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केली. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे जय मल्हार कांती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे आद्यकांतीवीर राजे उमाजी नाईक यांची १९१ वी पुण्यतिथी मानवंदना सोहळा कार्यक्रमाला गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
अजित पवारांवर खालच्या भाषेत टीका : संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असे जे कोणी म्हणता आहे. त्यांची कदाचित सुंता झाली असेल. ज्यांना असे वाटते, त्यांची परिस्थिती आता जाऊन तपासली पाहिजेव असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. गोपीचंद पडळकर यांच्या या शेलक्या भाषेमुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर हे सातत्याने पवार घराण्याचा डिवचताना दिसतात. यावर अजित पवार देखील चोख प्रत्युत्तर देतात. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तेव्हा अजित पवार यांनी मी डिपॉझिट जप्त झालेल्यांवर बोलत नाही,अशी खोचक टीका अनेकदा केली आहे.
धर्मवीर वक्तव्यावरुन वाद : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते त्यांना धर्मवीर म्हणू नका. त्यांना कोणत्याही एका धर्माशी जोडणे उचित ठरणार नाही. असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप कडून आंदोलन करण्यात आलं होत. त्यानंतर अनेक दिवस यावरुन मोर्चे, आंदोलनं, आरोप-प्रत्यारोप सुरु होते. हा वाद आता कुठे तर शांत होत असताना पडळकर यांनी हा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. यावरुन अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा - Ajit Pawar on VBA : 'वंचित' महाविकास आघाडीमध्ये सामील होणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले की...