पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिरातील देवदर्शन बंद ठेवण्यात आले आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी मंदिरांना लक्ष करायला सुरुवात केली आहे. जुन्नर तालुक्यातील आणे गावात कालिका माता मंदिरात भरदिवसा देवीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरातदेखील चोरी झाली होती. त्यामुळे आता देव सुरक्षित नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
जुन्नर तालुक्यातील आणे येथील कालिका माता मंदिरातील देवीच्या अंगावरील चांदीचे दागिने आणि मुकुट चोरीला गेला आहे. कालिका देवीचे पुजारी साईनाथ सासवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्टला दुपारच्या सुमारास आणे इथल्या खालच्या पेठेत असलेल्या कालिका देवीच्या मंदिरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. व देवीचा 1 किलो 200 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट व देवीच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरून नेले.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार व गाभारा अशा दोन्ही दरवाजांना असलेली कुलुप न तोडता चोरट्यानी गाभाऱ्याला असलेल्या झरोक्यातून आत प्रवेश करून चोरी केल्याचे साईनाथ सासवडे यांनी सांगितले. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने पोलिसात तक्रार दिली. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडच्या भाजपा महापौरांना अजित पवारांच्या कानपिचक्या