पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोड्या करणा-या चार आरोपींना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 लाख एक हजार 870 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी विकी बाजीराव पाटील वय-20, रा. जुनी सांगवी, तोहेब फय्याज खान वय-29, विशाल बाळू माने वय-32, दोघे रा. खडकी, योगेश उर्फ घा-या संजय यादव वय-28, रा. विश्रांतवाडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीच निघाला चोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात एक घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात विकी पाटील याने फिर्याद दिली होती. त्या घरोफोडीमध्ये घरातून अडीच लाख रुपये किमतीचे दहा तोळे सोन्याचे दागिने, सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी विकी पाटील हाच चोर असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून अडीच लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
चोरी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक
त्यानंतर 27 डिसेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्यात सांगवी पोलिसांनी तोहेब, विशाल आणि योगेश या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख 51 हजार 870 रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कार असा एकूण 6 लाख 51 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.