रांजणगाव (पुणे) - शिरूर तालुक्याच्या रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असून आरोपींकडून धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
हेही वाचा - ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार - पंकजा मुंडे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे-नगर महामार्गावर फैसल मलिक इजाज अहमद मोमीन हे रात्रीच्या सुमारास मित्रांसोबत वाहनाने बाहेरगावी जात होते. यावेळी अचानक पल्सर दुचाकीवरून तीन व्यक्तींनी वाहनाच्या मागून येऊन, तुम्ही अपघात केला असल्याचे सांगत थांबविले. यावेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून फैसल यांच्या खिशातील पैसे काढून घेतले. तसेच, त्यांना पेट्रोल पंपावर नेऊन त्यांच्या एटीएममधून दहा हजार रुपये रक्कम देखील काढून घेतली. हा प्रकार घडत असताना वाहनात असणाऱ्या दुसऱ्या मित्राने पोलिसांना सदर घटनेची माहिती कळवून लोकेशन पाठवले.
यावेळी रांजणगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ धाव घेत आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केला असता, दोन आरोपी पोलिसांना सापडले, मात्र एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. दोन्ही आरोपींची चैकशी केल्यानंतर तिसऱ्या आरोपीस कारेगाव येथील एका खोलीत पोलीस पथकाने जाऊन अटक केली. रितेश वाल्मिक वाळके (वय 29) व अजय सुर्यगंध (वय 25. दोघेही रा. मांडवगण फराटा) ऋतिक बंडू परदेशी (रा. सादलगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
ऋतिक याच्या खोलीची तपासणी करत असताना पोलिसांना तीन तलवारी मिळून आल्या. तर, अटक केलेल्या आरोपींकडून 13 हजार 500 रुपये रक्कम, चाकू, मोटारसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. हा तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, अनिल चव्हाण, रघुराज हळनोर, प्रकाश वाघमारे, उमेश कुतवळ, विजय शिंदे, साबळे यांच्या पथकाने केला.
हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय उद्घाटनाला गर्दी, शहराध्यक्षासह 150 जणांवर गुन्हा