पुणे - मुख्यमंत्र्यांच्या मागे असलेल्या बहुमतावर अविश्वास होता त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाची मागणी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने हा विश्वासदर्शक ठराव मांडण्याची गरज उरली नाही. त्यामुळे बुधवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार नाही, असे घटनातज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले.
हेही वाचा - विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती, राजभवनात घेतली शपथ
महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आपला नेता निवडतील आणि हा नेता सत्तेचा दावा दाखल करेल. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याने राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल राष्ट्रपतींना करतील, याची शक्यता फारच कमी आहे. महाविकासआघाडीने आपला दावा दाखल केल्यानंतर शपथ विधी केला जाईल. राज्यपालांकडून त्यांना विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी वेळ दिला जाईल. मात्र, या सर्व घडामोडी कितपत वेगाने घडतील हे सांगता येणार नाही, असे मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले.