पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये डेटिंग साईट शोधणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. डेटिंगची सेवा न देता वेळोवेळी विविध कारणांसाठी तब्बल ६५ लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मे आणि सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान घडली. जयंत विश्वनाथ ढाळे (वय ४०) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा - हैदराबादमधील पीडितेला न्याय मिळाला, कोल्हापुरातील तरुणींकडून पोलिसांचे अभिनंदन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत हे इंटरनेटवर डेटिंगसाठी सर्च करत होते. त्यावेळी त्यांना 9733901295 हा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावर जयंत यांनी फोन केला. फोनवरील व्यक्तीने जयंत यांना प्रथम रजिस्ट्रेशन करायला सांगितले. रजिस्ट्रेशन केल्यानंतर डेटिंगची पुढील सर्व्हिस मिळेल, असे जयंत यांना सांगण्यात आले. त्यानुसार रजिस्ट्रेशन करताना जयंत यांनी बँकेच्या खात्यावर काही रुपये भरले.
हेही वाचा - ...म्हणून जनतेमध्ये रोष - अॅड. सुदर्शना जगदाळे
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना आरोपींनी सेवा दिली नाही. उलट वेगवेगळी कारणे सांगून त्यांना पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे भरूनही सेवा मिळत नसल्याने जयंत यांनी त्यांचे प्रोफाइल बंद करण्यास सांगितले. त्यानंतरही प्रोफाइल क्लोजर, होल्डिंग चार्ज, अकाउंट व्हेरिफिकेशन, प्रोफाइल मॅचिंग, कमिशन अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आणखी पैसे भरण्यास भाग पाडले. याप्रकरणी आरोपींनी जयंत यांची एकूण 65 लाख रुपयांची फसवणूक केली. पैसे देऊनही सेवा न देता तसेच प्रोफाइल बंद न करता आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच जयंत यांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे धाव घेतली.
हेही वाचा - 'न्यायव्यवस्थेकडून लवकर न्याय मिळत नाही म्हणूनच लोकांमध्ये तीव्र भावना'
दरम्यान, सायबर सेलने तपास करून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे तपास करत आहेत.