पुणे- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून कोविशील्ड लस घेऊन जाणाऱ्या ३ कंटेनरची दुसरी फेरी पुढे ढकलण्यात आली आहे. सिरममधून आज एकूण 6 कंटेनर बाहेर पडतील असे बोलले जात होते मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पुढचे 3 कंटेनर बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे.
यापूर्वी हे तीन कंटेनर सकाळी 10 ते 11 दरम्यान बाहेर पडतील अशी शक्यता होती मात्र, याबाबत दुपारी 3 नंतर स्पष्टता होईल. कदाचित आज हे कंटेनर जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी पहाटे गेलेले तीन कंटेनर विमानाच्या माध्यमातून देशाच्या इतर भागात पोहोचवण्यात येत आहेत. सिरम इन्स्टिट्यूटला मिळालेल्या पहिल्या ऑर्डरनुसार आणखीन तीन कोल्ड कंटेनर सिरम मधून बाहेर पडणार होते आणि हे कंटेनर रस्त्याच्या मार्गाने देशातील विविध राज्यात पोहचवण्यात येणार होते. त्यातील एक कंटेनर मुंबईला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, कंटेनरची ही दुसरी खेप पुढे ढकलल्याचे सांगण्यात येत आहे.