पुणे - सहकारी पोलीस कर्मचाऱ्याला ऑनड्युटी रस्त्यात मारहाण करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. विजयकुमार सुभाष पाटणे असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी श्रावण शेवाळे या पोलीस कर्मचाऱ्याला 10 मे रोजी मारहाण केली होती.
याप्रकरणी, शेवाळे आणि पाटणे दोघेही पोलीस शिपाई असून कोथरूड पोलीस ठाण्यात काम करतात. 10 मे रोजी दोघांचीही नेमणूक मास्क कारवाईसाठी करण्यात आली होती. परंतु पाटणे यांनी नेमून दिलेले काम सोडून शेवाळे काम करत असलेल्या ठिकाणी गेले. आणि पौड रोड येथील नाकाबंदीवर जाऊन त्यांना भररस्त्यात शिवीगाळ करत मारहाण केली.
कोथरूड पोलीस ठाण्यातील वरिष्ठांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी या घटनेची नोंद केली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या संपूर्ण घटनेची चौकशी केली. त्यात सुभाष पाटणे हे दोषी असल्याचे दिसून आले. पाटणे यांनी भररस्त्यात केलेल्या या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेत पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत त्यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले.
हेही वाचा - बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आंतरराष्ट्रीय संस्थांचे बाह्य तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्त