जुन्नर/पुणे - तालुक्यातील आळेफाटा परिसरातील एका बंगल्याच्या आवारात रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही मध्ये बिबट्या त्याची शिकार शोधत असताना कैद झाला आहे. शिकाराच्या शोधात हा बिबट्या बंगल्यात शिरला. परंतु, आतमध्ये असलेल्या कुत्र्याने त्या बिबट्याला पळवून लावल्याचा प्रकार आळेफाटा परिसरात सुरेश गडगे यांच्या सोसायटीत घडला आहे. पुणे नाशिक महमार्गावर धानापुणे सर्व्हिस स्टेशन शेजारी हा बंगला आहे.
जनावरांसह तरुणांवरही हल्ले
जुन्नर तालुक्यात आतापर्यंत बिबट्याने जनावरांसह तरुणांवरही हल्ले केलेले आहेत. काही दिवसांपूर्वी जुन्नर परिसरातील वैष्णवधाम येथील गोपाळ ज्ञानेश्वर पवार ह्या युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. अशा घटना पुन्हा घडू नये, याकरिता वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी, अश्या सूचना जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. तरीही तालुक्यात दरोरोज बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत.
हेही वाचा - पुण्यात संततधार पाऊस, जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी पातळीत अर्धा टीएमसी वाढ