पुणे - गेल्या महिन्याभरापासून पुण्याच्या ग्रामीण भागात भल्या पहाटे कडाक्याच्या थंडीत पांढऱ्याशुभ्र धुक्यांची चादर पसरलेली दिसून येतेय. मात्र या धुक्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दाट धुक्यांमुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील डोंगर माळरानांसह शहरी भागातील परिसरात थंडी व धुक्यांची वाढ झाली आहे. वाढती थंडी व वातावरणातील पसरलेले धुके शेतीवर रोगराई पसरवत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत वातावरणात बदल जाणवत आहेत. दाट धुक्याची पांढरी चादर सर्वत्र पसरली आहे. बदलत्या हवामानामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडला आहे. या वातावरणाच्या लहरीपणाचा प्रमुख फळपिक असलेल्या आंब्याला सर्वाधिक फटका बसत आहे. बदलत्या हवामानामुळे आंब्यावर औषधे फवारण्याची आवश्यकता भासणार आहे. या अतिरिक्त खर्चामुळे औषध फवारणीमुळे आंबा उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. तसेच मोहोरावर करपा रोग पडण्याची शक्यताही शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आता अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुन्हा संकटात सापडला आहे.
हेही वाचा - '१७ वर्षीय पाकिस्तानी खेळाडू प्रत्यक्षात २८ वर्षांचे', आसिफचा खळबळजनक खुलासा