पुणे: जगप्रसिद्ध टेस्ला कारची निर्मिती करणारी टेस्ला कंपनी भारतात आगमन करण्यास सज्ज झाली आहे. टेस्ला कंपनीने भारतातील पहिले कार्यालय पुण्यात करण्याचे निश्चित केले आहे. येरवडामधील पंचशील बिझनेस पार्कमध्ये टेस्ला कंपनीचे कार्यालय होणार आहे.टेस्लाचे कार्यालय आधी मुंबईत होणार असल्याची चर्चा होती, परंतु हे कार्यालय आता पुण्यात होणार आहे. टेस्लाने पंचशील बिझनेस पार्कमध्ये 5 वर्षांच्या भाडेतत्त्वावर कार्यालय घेतले आहे.
किती आहे भाडे: टेस्ला इंडिया मोटार अँड एनर्जी ही टेस्ला कंपनीची भारतातील उपकंपनी आहे. या कंपनीने पंचशील बिझनेस पार्कमध्ये पहिल्या मजल्यावर 5 हजार 850 चौरस फुटांचे कार्यालय भाड्याने घेतले आहे. या कार्यालयाचे दरमहा भाडे हे 11.65 लाख रुपये एवढे आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीजकडून हे कार्यालय 5 वर्षासाठी भाड्याने घेण्यात आले आहे. या कार्यालयाचे भाडे हे 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी मागील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. कंपनी भारतात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहे. त्यादृष्टीने कंपनीच्या अधिकाऱ्यांची सरकारसोबत चर्चा देखील सुरू असल्याचे मस्क त्यावेळी म्हणाले होते. सरकारने इलेक्ट्रिक मोटारींवरील आयात शुल्क कमी करावे, अशी मस्क यांची मागणी आहे. जर हा निर्णय झाला तर टेस्लाच्या कार भारतात आयात करणे शक्य होणार आहे. त्यामधून कंपनीची मोठ्या प्रमाणात विक्री वाढणार आहे.
२०२१ मध्येच नोंदणी: टेस्लाची भारतातील उपकंपनी टेस्ला इंडियाने बंगळुरूमध्ये 2021 साली सुरूवातीला नोंदणी केली होती. कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांनी 2019 मध्येच भारतात गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली होती. परंतु त्यानंतर पुढे काही हालचाली झाल्या नव्हत्या. पण आता पुण्यात कार्यालय येत असल्याने भारतासाठी ही महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले जात आहे.
मॉडेल एसमुळे चर्चेत: टेस्ला मोटर्सची स्थापना 2003 साली मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टार्पेनींग यांनी केली होती. परंतु एलॉन मस्क यांनी कंपनीचे सूत्र हाती घेतली तेव्हापासून कंपनीची घोडदौड सुरू झाली. टेस्ला कंपनी 2012 मध्ये मॉडेल एस या इलेक्ट्रिक कारमुळे खूप चर्चेत आली होती. कंपनीने सर्वात आधी स्पोर्ट्स स्टार हे मॉडेल आणले होते. पण कंपनीचा खरा दबदबा हा एस मॉडेलमुळे निर्माण झाला होता. मॉडेल एस कार ही जगभरातील कार विक्रीच्या क्रमवारीत अव्वल ठरली होती.
हेही वाचा-