पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील आठ दिवसांपासून वातावरणात गारवा वाढला आहे. किमान तापमान 4.9 सेल्सिअसने खाली घसरले आहे. त्यामुळे थंडीची हुडहुडी वाढल्याने नागरिक उबदार कपडे आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत. ही थंडी अशीच वाढत राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत.
वातावरणातील गारवा वाढला -
मागील आठ दिवसांपासून पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरुर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. त्यामुळे या परिसरात हवेतील गारठा वाढला आहे. शेती व परिसरातील हिरवाईमुळे या थंडीत अजुनच वाढ होत आहे. थंडी वाढल्याने नागरिक शाल, स्वेटर, कानपट्टी वापर करत आहेत. त्यातुनही थंडी पळाली नाही तर, शेकोटीचा आधार घेतला जात आहे.
किमान तापमान 4.9 अंश सेल्सिअसने घसरले -
पुणे वेधशाळेने रविवारी किमान तापमान 18.7 अंश सेल्सिअस नोंदवले होते. सरासरीपेक्षा 7.5 अंश सेल्सिअसने तापमान कमी झाले. त्यामुळे हवेतील गारवा वाढला. शुक्रवारी सकाळी पुण्याच्या ग्रामीण भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा 2.9 अंश सेल्सिअसने कमी होऊन 13.8 अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. गेल्या सहा दिवसात तापमान 4.9 अंश सेल्सिअसने घसरल्याचे निरिक्षण हावामान खात्याने नोंदवले आहे.
शेकोट्यांमुळे दिलासा -
येत्या काही दिवसात पुण्याच्या ग्रामीण भागात थंडी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात सायंकाळनंतर थंडीमुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तर, माळरानावर, अंगनाबाहेर पेटवलेल्या शेकोट्यांच्या भोवती नागरिक जमा होताना दिसत आहेत.