पुणे : टोलनाक्यावर तामिळनाडूच्या ट्रक चालकाने टोलच्या कर्मचाऱ्याला तब्बल 12 किमी फरफटत नेल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना पुणे सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोल नाक्यावर शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. तामिळनाडूच्या ट्रक चालकाने टोल कर्मचाऱ्याला फरफटत नेल्यामुळे पुणे सातारा महामार्गावर हा जीवघेणा थरार नागरिक पाहत होते. त्यामुळे नरसापूर गावातील नागरिकांनी या टोल कर्मचाऱ्याची सुटका केली. यावेळी गावकऱ्यांनी या ट्रक चालकाला चांगलाच चोप दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
टोलच्या पैशावरुन झाला वाद : तामिळनाडूचा ट्रक चालक आपला ट्रक ( क्रमांक टीएन 48 बीसी 6280 ) घेऊन पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवपुरी येथील टोल नाक्यावर आला होता. यावेळी ट्रक चालकाला टोल नाक्यावर असलेल्या कर्मचारी सौरभ कोंडे याने गाडी ओव्हरलोडेड आहे का अशी विचारणा केली होती. यावेळी सौरभ कोंडे गाडीवर चढताच ट्रक चालकाने ट्रक सुसाट पळवला. त्यामुळे टोल कर्मचारी सौरव कोंडे हा ट्रकवर तसाच लटकून होता. पुणे सातारा महामार्गावर हा जीवघेणा थरार रस्त्याने जाणारे प्रवासी पाहात होते. मात्र ट्रक सुसाट असल्याने सौरव कोंडेला वाचवण्यासाठी कोणीही धजावत नव्हते.
नरसापूरच्या गावकऱ्यांनी अडवला ट्रक : नरसापूरच्या गावकऱ्यांना ट्रक चालक टोल कर्मचाऱ्याला फरफटत नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या गावकऱ्यांनी या ट्रक चालकाला थांबवण्याची सूचना केली. यावेळी ट्रक चालका जुमानत नसल्याने गावकऱ्यांनी या ट्रक चालकाला मोठा धोका पत्करुन रोखण्यात यश मिळवले. टोल कर्मचाऱ्याला 12 किमी फरफटत नेल्यामुळे संतप्त झाले होते.
गावकऱ्यांनी ट्रक चालकाला चोपले : खेड शिवपुरी येथील टोल नाक्यावर तामिळनाडूच्या ट्रक चालकाने टोलच्या कर्मचाऱ्याला फरफटत नेल्यामुळे पुणे सातारा महामार्गावर मोठी खळबळ उडाली होती. तामिळनाडूच्या ट्रक चालकाने तब्बल 12 किमी या कर्मचाऱ्याला फरफटत नेल्यामुळे नरसापूर येथील नागरिक चांगलेच संतप्त झाले. या नागरिकांनी ट्रक अडवून चालकाला चांगलाच चोप दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ट्रक चालकाला चोपल्यानंतर गावकऱ्यांनी या चालकाला किकवी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. किकवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.